सौन्दती ची रेणुका आई

मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती यात्रे नंतर कोल्हापूरकरांना वेध लागतात ते ओढ्यावरच्या आंबिल यात्रेचे.
ओढ्यावरची यल्लम्मा अर्थात सौंदत्ती रेणुकेचे कोल्हापूर आणि पंचक्रोशीतले जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान. जयंती नंदी च्या तीरावर रेणुका परशूराम मातंगी आणि मंदिरा पासून दूरवर वसलेलं जमदग्नी अशा मंदिरांचा हा समूह कायमच भक्तांनी गजबजून जातो. या मंदिराशी निगडीत उपासना आहे ती जोगती संप्रदायाची . स्वत:चे जीवन रेणुका चरणी अर्पण करून तीच्या जोगव्यावर जीवन चालवणाऱ्या या वर्गाची सगळी सुखदुःख देवी बरोबर जोडलेली असतात.
गेली कित्येक दशके कोल्हापूरातील मानाचे तीन जग म्हणजे देवीचा मुखवटा सजवलेली वेताची परडी घेऊन जोगती मंडळी सौंदत्तीला जातात. ओढ्यावरच्या मंदिरातला सोनाबाई(माई) जाधव रवीवार पेठ टेंबे रोड येथील बायाक्काबाई चव्हाण कसबागेट गंगावेश येथील लक्ष्मीबाई जाधव अशा तीन जगाबरोबर गेलेल्या काही वर्षांपासून बेलबाग येथील आळवेकरांचा जग चंपाषष्ठी दिवशी सौंदत्तीला प्रस्थान करतात. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी निघून गोकुळ शिरगाव येथे मुक्कामी येतात. तिथे जीच्या परवानगी ने यात्रेला गेले त्या त्र्यंबुली देवीची कृतज्ञता म्हणून जत्रा करतात.आंबिल यात्रेच्या पूर्व संध्येला ओढ्यावर मंदिरात येतात रेणुका परशुराम मातंगी ची आरती करतात सासनकाठी सह मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून आपल्या नियत जागी विराजमान होतात. आंबिल यात्रे दिवशी पहाटे देवांना अभिषेक घालून अलंकार महापूजा केली जाते. मग भाविकांची गर्दी होते ती नैवेद्य अर्पण करण्यासाठी. हा नैवेद्य म्हणजे अस्सल मराठमोळ्या पाककृतींचा नमुना आहे. भाकरी वरणं म्हणजे पावटा आणि वांग्याची एकत्र भाजी मेथीची भाजी पाटवड्या बेसन लावून केलेली ताकाची कढी म्हणजे आंबिल भात दही कांद्याची पात गाजर केळ लिंबू असं ताट सजवून भक्त देवळात गर्दी करतात. देवीला नैवेद्य अर्पण करून आपण आपल्या नातेवाईकांसह सहभोजन करतात.जत्रेतल्या खेळांचा खरेदी चा आनंद लुटतात. या नैवेद्य अर्पण करण्यात एक अनोखा रिवाज आहे एका भक्ताने दिलेला नैवेद्य दुसऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून दिला जातो.
दुपारी आरती पालखी सोहळा होतो. आता जत्रेला रंग चढतो .रात्री जगांची आरती होते आणि सुती चौंडक्याच्या तालावर जग आपापल्या घरी मार्गस्थ होतात.आणि यात्रेचा सोहळा संपन्न होतो.
या सगळ्या सोहळ्याला खरं तर एक भावनिक कांगोरा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी विधवा होते त्या दिवसापासून देवी आणि तिचे जोगती यांनी कुंकू आणि पर्यायाने सर्व सौभाग्य अलंकाराचा त्याग करतात ही आंबिल भाकरी म्हणजे त्यांना म्हणजे अगदी देवीला देखील सांत्वनाचा घास भरवायचा तिला आणि जोगती मंडळीना पुन्हा कुंकू आणि सौभाग्य अलंकार अर्पण करून पुन्हा पूर्ववत शृंगार सुरू करण्यात येतो. असा हा आंबिल यात्रेचा सोहळा जणू सुखदुःखाच्या सिमारेषेची जाणीव च म्हणावी लागेल.
ॲड.प्रसन्न विश्वंभर मालेकर कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

हारजीत

तन्हाई (गझल)

मेनोपौज आणि ती